ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत….
प्रस्तावनाः
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता/शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आले होते.
दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्रमांक ४ ते ७ येथील पत्रान्वये प्राप्त झाले आहेत. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५% एवढा असा एकूण रु २८६०८४.०७ लाख ( अक्षरी रुपये दोन हजार आठशे साठ कोटी चौऐंशी लाख सात हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
- या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.
- वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. संदर्भाधीन क्रमांक २ येथील दिनांक ०२.१०.२०२१ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. त्या वाढीव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) संदर्भाधीन क्रमांक १ व ३ येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित करण्यात आलेला निधीतून भागविण्यात यावा. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.
- पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.
- सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील.
संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Parbhani yadi