शासन निर्णय: ग्रामपंचायतीचे हे अधिकार कमी केले | सरपंचाच्या अधिकारावर मर्यादा | राज्य सरकार नविन परिपत्रक

राज्यातील ग्रामपंचायतीमधील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय न करण्याबाबत shasan nirnay

शासन निर्णय: संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९मधील कलम ६१(१) अन्वये पंचायातीला आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येईल व त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देता येतील. तसेच ६१अ (१) अन्वये पंचायतीची लोकसंख्या, उत्पन्न व उपयोगक्षम साधनसंपत्ती आणि विहित करण्यात येतील असे अन्य घटक विचारात घेता, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असे निदेश देईल की, पंचायतीस किंवा पंचायतींच्या गटास ,पंचायतींचा योजनाबध्द विकास करण्यासाठी पंचायत विकास योजना, जमीन विकास योजना, पर्यावरण विकास योजना तसेच विकास केंद्र म्हणून अशा पंचायतींच्या किंवा पंचायतींच्या गटाच्या विकासाकरिता उपजीविका व रोजगार विकास योजना, भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधा विकास योजना आणि इतर संबंधित कार्यक्रम आखणे, तयार करणे, राबविणे त्यांची अंमलबजावणी करणे, व्यवस्था पाहणे, देखभाल करणे व देखरेख ठेवणे यासाठी कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ञ, तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ नेमता येईल.

(२) पोट कलम (१) अन्वये नेमलेले तज्ञ, तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळ हे राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने तयार केलेल्या नामिका (Pannel) मधून असेल, आणि अशा प्रकारे नेमलेल्या व्यक्ती, विहित करण्यात येतील अशी अर्हता व अनुभव धारण करतील आणि त्यांना विहित करण्यात येतील अशा अटी व शर्तीवर नेमण्यात येईल अशी तरतूद आहे.

परंतु बऱ्याच ग्रामपंचायती सदर तरतूदींचे पालन न करता मोठ्या प्रमाणात कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासंबंधी निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ६१ व ६१ अ (१) (२) मधील तरतूदीनुसार निर्देश देण्यात येते की, ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ञ, तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक करताना संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊनच नेमणूक करण्यात यावी. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशाप्रकारे ग्रामपंचायतीमध्ये करावयाच्या मनुष्यबळाच्या नेमणुकासाठी अर्हता व अनुभव धारण करणाऱ्यांची नामिका ( Pannel ) जिल्हा स्तरावर तयार करावी व त्या नामिका नुसारच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी तत्वावर किंवा सल्लागार तत्वावर तज्ञ, तांत्रिक सहाय्य अभिकरणे आणि कुशल मनुष्यबळाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने करावी. सदर सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये